Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)
Showing posts with label kiran jadhav. Show all posts
Showing posts with label kiran jadhav. Show all posts

Tuesday, December 29, 2015

Hypocrite - 1

Hypocrite - 1


अंधश्रद्धा निर्मुलन हा त्याचा आवडता विषय. बुवाबाजी, भगतगीरी, तांत्रिक-मांत्रिक यांचे समाजात वाढलेले स्तोम ह्या विषयावर त्याचा हातखंडा.

काल्पनिक रामायण, महाभारत, मळाचा गणपती, शंकर बिंकर, शिवलींग, विष्णु फिष्णु, अमर हनम्या, फालतू मुर्तीपुजा हे शब्द त्याच्या बोलण्यात असायचेच, खुप छान बोलायचा यावर, तासनतास, अगदी पटेल असंच.

पोर होत नाही म्हणून गेले सहा महिने एका भगताचा, मांत्रिकाचा उंबरा झिजवताना पाहिलंय त्याला लोकांनी..........

#किरण_जाधव_KJ

Wednesday, December 4, 2013

खराखुरा पाऊस....

खराखुरा पाऊस....
+++++++++++


तसा पाऊस येतो अन जातो
पण लक्षात काही राहत नाही
कारण कुठल्याच मुलीबरोबर मी
एकाच छत्रीतून जात नाही॥

तीच्या बरोबरचा अनुभव
थोडा वेगळा होता
कधी पाऊस रिमझीम तर
कधी कोसळत होता...

मुसळधार पाऊसही
हवाहवा वाटत होता
छत्रीत ती होती म्हणून
पाऊस नवानवा भासत होता॥

छत्री होती एक
पाऊस होता मुसळधार
आणि त्या पावसात
ती भिजली होती पार...

ओलेचिंब कपडे झाले
तिचे अन माझे
केसांतून झंरणारं पाणी
पाहत होते मन माझे॥

तिचा तो गुलाबी ड्रेस
पाण्यानं पार भिजला होता
एकांत भासणरा रस्ताही
कस्तुरी गंधान सजला होता...

कधी ओढणी सावरत होती,
कधी केस सुकवत होती
माझी नजर होती तिच्यावर
ती मात्र ती चुकवत होती॥

तिला पाहुन छत्री सुटत होती
कधी सुटत होता मनावरचा ताबा
तिच्या मनात साधी रिमझीम तरी
इथं माझ्या मनात, प्रेमाचा धबधबा...

कधी वाटलं हातात हात घेऊ का?
कधी वाटलं मिठीत घेऊ का?
चेहर्यावरून ओघळणारं पाणी
ओठानं मनसोक्त पिऊ का? ॥

शक्य नव्हतं ते सारं
अंगात भिनलं होतं प्रेमाचं वारं
बेभान करत होता ऋतू मला
हसत होती सर माझ्यावर...

अचानक वीज चमकली
घाबरून बाहुपाशात आली माझ्या
त्यावेळी असं वाटलं
भर दुपारी चंद्र, घरी आला माझ्या॥

सारा आसमंत
माझ्यासारखाच प्रेमानं भिजला होता
खरंच पहिल्यांदा वाटलं
खराखुरा पाऊस आला होता
खराखुरा पाऊस बरसला होता....

======================================
किरण जाधव...[तिच्याबरोबर एकाच छत्रीतून जाताना...]
======================================

Saturday, November 30, 2013

या रक्ताळलेल्या हृदयाला...

या रक्ताळलेल्या हृदयाला...
++++++++++++


तुझं आपल बर आहे,
लिहिशील सार दु:ख वहीत
अन भळाभळा रडशील
शब्दांच्या कुशीत ...

मी..मी काय कराव?
कुणाकडे पहाव?
तूच सांगना मी
कुणाच्या कुशीत शीराव?..

तुझ्यासाठी हाही क्षण
बनेल एक काव्य..पण
डोळ्यातील आसव लपवयाच
मलाच कराव लागेल दिव्य...

वाचणारा म्हणेल तुला
कवितेत काय दु:ख भरलय
पण, त्यांना काय माहित
खर दु:ख इथे ह्रुदयात मुरलय...

तू लिहिशील रे प्रत्येक क्षणावर
काव्य आणि काव्यच फ़क्त
पण पाहशील रे कधी
या ह्रुदयातुन सांडणारे रक्त...

ठीक आहे, तू म्हणतोस ना
मला तुझ्यासारखी सवय करायला हवी
पण त्या आधी या रक्ताळलेल्या हृदयाला
खपली धरायला हवी...
खरच खपली धरायला हवी...
===================================
किरण जाधव..[थोडे कवीच्या प्रेयसीच्या मनातल..]
=================================== 

षंढ....

षंढ....
+++++++++


मी माझ्या बायकोवर प्रेम करतो
तिला फुला सारखा जपतो
तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो
तिचा प्रत्येक शब्द पाळतो...

मग ते..मेलेल्या बापाचा भिंतीवरचा फोटो 'हटवण' असो
की म्हातार्या आईला वृद्धाश्रमात पाठवण' असो,
किंवा करियरच्या आड येणार्या मुलाला 'पाडण' असो.. वा
आया मिळत नाही म्हणुन आईला बोलावण्याचा निरोप 'धाडण' असो

मी तिचा प्रत्येक शब्द झेलतो, तिला हव तसे वागतो....

कधी वाटते मग..प्यावी, मजबूत प्यावी
जाउन सरळ कानशिलात वाजवावी तिच्या
विचारावा जाब तिला, तिच्या अशा वागण्याचा...

पण...
पण तिला आवडत नाही, म्हणुन मी दारू पीत नाही
खर सांगायचे तर, प्यायल्यावर ती बिछान्यावर घेत नाही

मग रात्र काढावी लागते तळमळत
जशी आता काढतोय
विचारांच थैमान माजत..
भलते-सलते विचार येतात डोक्यात
मन माझंच खात मला
बोलत साला..
दोन पोर काढूनहीं तू 'षंढ'
बायकोपुढे 'षंढ'
थू तूझ्या जिंदगीवर !!!!

[ही कविता त्याना अर्पण..जे आई-बापाला कुत्र्यांसारख वागवतात..पण असतात बायकोच्या ताटाखालचे मांजर..अरे आता तरी उठा रडव्यानो.. सॉरी 'र' च्या जगी 'भ' हवा होता...]


किरण जाधव..[रडव्यांच्या जगात..]

आई....

आई....
++++++++

आठवतो तो काळ अजूनही
आईसोबत घालवलेला
मृत्यूशय्येवर असताना ती
काळही माझ्यासोबत, बाजूला बसलेला...

आई मरणासन्न अवस्थेतही
हासत होती, बोलत होती
मी होतो अजाण- भोळा
कशाचीच मला जाणीव नव्हती...

खाटेवर निजली होती ती
काळ आपले पाश,
मानेवर तिच्या ओढत होता
खिन्न नजरेने तिचे वेडे लेकरु
तिच्या मरणा~या देहाकडे पाहत होता...

अखेर तो काळ आला
आईचा आवाज ...
बोलता बोलता बंद जाला
काहीतरी वाईट घडले
एवढच समजुन
माझाही टाहो फुटला...

आई सोडून गेली होती
मला- आम्हा सर्वांना
सार घर रडा-रडीत भीजल
कळल होत मलाही एव्हाना...

तशी जाण नव्हतीच कळण्याची
तरीही मी रडत होतो
का नेलेस माझ्या आईला
म्हणुन देवाजवळ भांडत होतो...

सार काही संपल होत
आई सोडून गेली होती
पण ...
पण मरता मरता जगण्याची
नवी जिद्द देऊन गेली होती...

आजही तोच दिवस आहे
काळ ही तोच ओळखीचा
आज... सार काही आहे माझ्याकडे
पण आईसारख दैवत नाही,
माझ्याकडे आई नाही...आई नाही...

=============================
किरण जाधव...[आईसारख दैवत शोधतोय..]
============================= 

अस्तित्व...

अस्तित्व...
+++++++++

तो यायचा आणि पाहत बसायचा
अथांग असा सागर
अगदी एकटक, नजरेत मावेपर्यंत
सूर्य उगवल्यापासून,चन्द्र बुडेपर्यंत||

पाहत बसायचा तासन-तास
भरती-ओहोटीचा खेळ
कळायच नाही कधी दिस यायचा
कधी सरायची कातर वेळ||

ऐकायची होती त्याला समुद्राची गाज
मोजायची होती समुद्राची खोली
लावायचा होता सागराचा पत्ता
शिकायची होती सूर्य-चंद्राची खेळी||

शोधायला निघाला होता तो वेडा
समुद्राच अस्तित्व...
पण स्वतला हरवून,
स्वत:च अस्तित्व विसरून...

====================================
किरण जाधव...[अस्तित्व शोधताना ]
====================================

तो........

तो........


तो येणार म्हणुन ती खुश होती
थंड ओठांमध्ये आज उब होती
किती वेळा घर सजवत होती
हजारदा मनाला बजावत होती

आल्यावर तो सोफ्यावर बसेल
म्हणुन सोफा स्वच्छ हवा
चहा मागितल्यावर त्यान
कोणत्या कपात चहा द्यावा?

सा~या त्याच्या आवडी-निवडी
आज ती जपत होती
केवळ त्याच्या आवडी खातर
आज ती खपत होती

मुद्दाम आय-ब्रो केला होता
लिपस्टिक ओठांवर खुलत होती
ओठांची कमान वाकवून उगाच
सप्त-सूर उधळत होती

कधी नाही तो आज तिन
सजायला वेळ घेतला होता
मुद्दामच म्हणा, त्यान दिलेला
गुलाबी ड्रेस घातला होता

तिला ध्यास लागला होता
बेलच्या आवाजाचा
सारखा कानोसा घेत होती
वाजणा~या पाउल-खुणाचा

अन बेल वाजलीच
तो कदाचित आला होता?
पण...
दुसर-तीसर काही नसून
हा ही एक भास होता

असे भास तिला रोजच होतात
तो सोडून गेल्यापासून
अशीच रोज सजुन बसते ती
तो येइल अशी आशा ठेवून
वेडी आशा ठेवून.....

===================================
किरण जाधव....[तो...तिला वाट पहायला लावणारा ]
=================================== 

Friday, November 22, 2013

संध्याकाळची वेळ....

संध्याकाळची वेळ,
घरात माझ्या दिवा नाही
कसा आणू प्रकाश घरात
रानातही काजवा नाही...

संध्याकाळची वेळ,
हवेत आज गारवा नाही
कशी मोहरेल रात्र सारी
रातराणीचा ताटवा नाही...

संध्याकाळची वेळ,
त्यांच्या पत्राचा सुगावा नाही
कशी रमवू रात्री स्वत:ला
आठवणींचा मागोवा नाही...

संध्याकाळची वेळ,
घरात माझ्या नाखवा नाही
कशी बसू घरात एकटी
मी कोणी विधवा नाही.......

संध्याकाळची वेळ,
रानातही काजवा नाही
रातराणीचा ताटवा नाही
आठवणींचा मागोवा नाही
मी कोणी विधवा नाही.......

=====================================
किरण जाधव...[संध्याकाळच्या वेळी, तिला पाहताना...]
===================================== 

सखी...माझी सखी....kiran jadhav

सखी देशील ना मला साथ 
आयुष्यभर...
सखी देशील ना हातात हात
आयुष्यभर...

सखी...
आपल हे नातं तू, असच जपावं
आपण म्हातारे झालो तरी
मला पाहून तू, असच फुलावं
चेहर्यावर सुरकुत्या आल्या तरी...

सखी...माझी सखी
मिश्किलपणे हसते,
कानात येउन सांगते
"वेडा आहेस तू
नात्यांना कधी सुरकुत्या पडतात का?"

=============================
किरण जाधव...[प्रेमाची नाती जपताना...]
============================= 

Monday, November 4, 2013

पानगळती कधीचीच सरलेय... Kiran Jadhav

बेभान मनाला आज, आवरु नकोस
ढळ्णारा पदर उगाच, सावरु नकोस...

ढळू दे, त्याला ढळू दे
गळू दे, संयम गळू दे...
ऊरी लपलेल्या भावनांना
फुलू दे, आज फुलू दे...

मिठीत चंद्र घ्यावासा वाटतो,
मग घे त्याला...
स्पर्श वार्याचा हवासा वाटतो,
लगट करु दे त्याला...

थिरकतात पाय तुझे
मग बेभान होऊन नाच...
आरशात बघ स्वत:ला,
स्वत:चाच चेहरा वाच...

काय दिसतेय तुला...सांग ना...
सुकलेले ओठ,
मग त्यांची प्यास भागव..
विझलेले डोळे,
मग त्यात आस जागव...

जग आजची रात्र सखी..जग
ती ही तुझ्या सारखीच सजलेय...
ऊमलु दे आज देहाला तुझ्या
पानगळती कधीचीच सरलेय, कधीचीच सरलेय...

=================================
किरण जाधव...[सखीला समजावताना..]
================================= 

Sunday, November 3, 2013

एवढीच चुक तिची...Kiran Jadhav

तो आला काय अन गेला काय, 
ती वाहत राहिली, त्याच्या प्रवाहात
फक्त जळत राहिली, त्याच्या विरहात...

रडली - खचली,
त्याने दिलेल्या सुख-दु:खांचा
हिशोब मांडत बसली...

त्याचं येणं हे तिच्यासाठी मुसळधार पावसासारखं
चिखल करणारं, डोळ्यात पुर आणणारं
कदाचित असेल तो वळवाचा पाउस
नकळत येणारा, मातीला गंध देणारा...

त्याचं येणं हे तिच्यासाठी चक्री-वादळासारखं
पाला-पाचोळा करणारं, स्वप्न चक्काचुर करणारं
कदाचित असेल तो वार्याची झुळुक
हवीशी वाटणारी, अंगभर सळसळणारी...

त्याचं जाणं हे तिच्यासाठी असच, पूर्णविरामासारखं
संपवणारं - अंत करणारं
श्वासांना कायमचं शांत करणारं...
हरवत राहिली स्वत:ला ती, त्या पूर्णविरामानंतर
शेवट पाहत राहिली स्वत:चा, त्या पूर्णविरामानंतर...

एवढीच चुक तिची...
ती विसरली नवं वाक्य लिहायला, त्या पूर्णविरामानंतर
ती विसरली नवं आयुष्य जगायला, त्या पूर्णविरामानंतर

बस्स एवढीच चुक तिची, फक्त एवढीच...

===============================
किरण जाधव..[तिच्या चुकांतून शिकणारा...]
=============================== 

आता फुलांनी थोडं..Kiran Jadhav





आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...

पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...

इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...

कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव.......

=================================
किरण जाधव..[फुलांच्या कुशीत शिरताना...]
================================= 

माझ्या काही चारोळ्या...

1. मी तुला साथ दिली
    चंदेरी रात दिली
    तू दिलास फ़क्त भास
    न संपणारा प्रवास...

2. वयात आल्यापासून
    लाजाळुसारखी जगतेय
    ओठांना तुझा स्पर्श होताच
    डोळे नकळत मिटतेय...

3. पंखात बळ आणाव
    उंच-उंच उडायला
   इथ वेळ आहे कुणाला
   अपयशावर रडायला...

4. तू रुसावं
    तू हसावं
    या उन-पावसात
    मी फसावं...

5. वाट चुकलेल्याला तुम्ही
   घरचा रस्ता दाखवाल
   पण घरच नसलेल्याला
   तुम्ही कुठे पोहोचवाल?..

6. काल एक जोड़पं
   कातळामागे बसलेल पाहिलं
   ओठांचे गुज ओठांनी
   घेताना मी पाहिलं...

7. सज्जनता हा धर्मं होता
   फार पूर्वीच्या काळी
   आज सज्जनालाच तुडवतात
   तुमच्या-आमच्या गल्लोगल्ली..

8. मनापासून मन जाणणारी
    माणसं असतात कमी
    कमी म्हणजे अगदीच दुर्मिळ
    याची मी देतो हमी...

===========================
किरण जाधव...[चारोळ्यात रमणारा...]
============================= 

Thursday, October 17, 2013

तुझ्या देहाची रातराणी...

तुझ्या देहाची रातराणी...

तुझ्या देहाची रातराणी
माझ्या देही सजू लागलेय,
माझ्या प्रेमाचं बीज आता
तुझ्या देही रुजू लागलय...

श्वास माझा अगतीक
तुझ्या श्वासाच्या आक्रंदनानं,
बहरलाय आसमंत सारा
तुझ्या-माझ्या कस्तुरी गंधानं...

आता सोडू नकोस
हात हातात आलेला,
अन लपवू नकोस
ओठ ओठात आलेला...

पाळी, तापली कानाची
धडधड तन-मनाची,
पेटू दे अणू-रेणू
पर्वा नाही आज कुणाची...

वितळू दे आज रात
ही कापराच्या गतीनं,
ऊमलू दे मग दिस
दोन पाखरांच्या प्रितीनं...
वितळू देशील ना....

।।किरण जाधव।।

Saturday, September 5, 2009

प्रेमरोग...Kiran Jadhav

आजकाल शहरात एक रोग आलाय [स्वाईन फ्लु नाही]
ज्याला-त्याला प्रेमाचा ताप चढलाय
सारेजण प्रेमरोगी झालेत
आई-बापाचा पारा चढलाय ॥

गल्लोगल्ली फिरणारे प्रेमवीर
आता बसस्टाप वर उभे राहू लागलेत
मारूतीच्या देउळातही जोडपी [अरे मारूतीला तरी सोडा..तो ब्रम्हचारी होता रे बाबांनो]
जोडीनं काहितरी मागू लागलेत ॥

कालेजमध्ये या रोगाचा प्रसार झालाय
ज्याला-त्याला प्रेमाचा बुखार झालाय
त्यातच प्रेमदिवस जोडिला आलाय
व्हलेंटाईन डे म्हणून बोलबाला झालाय ॥

थिएटर्रस सारी फुल्ल आहेत
कालेजमधून मुले गुल आहेत
चोपाटीवर भेळपुरी खाण्यात
काही प्रेमवीर मशगुल आहेत ॥

खरंच आता जगाची खेर नाही कारण
यांना वाटतं, लव करणं गेर नाही
रस्त्या-रस्त्यावर रोड रोमियो उभे
जुलिएटचं त्यांच्याशी कसलचं वेर नाही॥

लहान मुलंही नाक्या-नाक्यावर
प्रेमाची भाषा बोलतात
"ग म भ न" येत नसलेतरी
"आय लव यु" लगेच बोलतात

स्वत:ला राम-सिता म्हणवतात हे
यांच्या प्रेमात काही राम नाही
क ष्णा सारख्या खोड्या करणार हे
पण यांच्यात राधेचा श्याम नाही ॥

प्रेमाची व्याख्याच बदलली आता
प्रेमालाही प्रेमधाम नाही
वर निल्ल्रजासारखे म्हणणार
लव येर्या-गबाळ्याच काम नाही ॥

बस्स..आता मात्र फार झालं
प्रेमाचा हा बाजार थांबला पाहिजे
पुन्हा एकदा या धरतीवर
प्रेमसखा अवतरला पाहिजे ॥

सारं जग प्रेममय होईल
प्रेमाचं गोकुळ येईल
कान्हाची मग बासरी वाजेल
अन राधा दीवाणी होईल

पुन्हा वसंत धावत येईल
प्रेमानं बागा फुलवून जाईल
देवाचा मग चमत्कार होईल
अन प्रेमाचा साक्षात्कार होईल
खर्या प्रेमाचा साक्षात्कार होईल॥।

=====================================
किरण जाधव
=====================================

प्रेममुसाफिर...Kiran Jadhav

नाही मी लेखक नाही, कवी नाही
नाही मी चंद्र नाही, रवी नाही
कोणत्याही उपमा देउ नका मला
मी यापेकी कोणीच नाही, कोणीच नाही ॥

नाही मी भ्रमर, फुलांवर फिरणारा
नाही मी तुषार, रिमझिम बरसणारा
नाही मी प्रेमवेडा, दिवाना जो बनणारा
नाही मी मजनु, लेला लेला करणारा ॥

मी नाही तो, ज्यानं ताजमहाल बांधला
मी नाही तो, ज्यानं प्रेमग्रंथ लिहिला
मी नाही तो, ज्यानं चंद्र-सूर्य घडविला
मी नाही तो, ज्यानं हा ब्रम्हांड रचिला ॥

मी नाही तो, जो अस्तित्व शोधतो
मी नाही तो, जो पुरून उरतो
मी नाही तो, जो चंदनापरी झिजतो
मी नाही तो, जो गंधापरी दरवळतो ॥

मग.... मी कोण?
का उगाच विचार करता..
विचारानं डोकं सडवता
अहो मानव आहे मी, मानवापुरता ॥

हो..मीच तो, माणुसकी शोधणारा
माणुसकीचा धडा सार्यांना देणारा
पेशाभोवती फिरणारी, दुनिया पाहणारा
पेसा नसे सर्वस्व हे ओरडून सांगणारा

हो..मीच तो,
प्रेम देणारा-प्रेम घेणारा
प्रेममुसाफिर.....

॥ किरण जाधव ॥

तुझी आठवण म्हणजे ...Kiran Jadhav

तुझी आठवण म्हणजे
भीजलेल्या श्रावणसरी
तुझी आठवण म्हणजे
तारुण्यातल्या अल्लड पोरी ॥

तुझी आठवण म्हणजे
इंद्रधनुने उधळलेले रंग
तुझी आठवण म्हणजे
हळदीने खुललेले अंग ॥

तुझी आठवण म्हणजे
उधाणलेला सागर
तुझी आठवण म्हणजे
काठोकाठ भरलेली घागर ॥

तुझी आठवण म्हणजे
वहित लपवलेले मोरपंख
तुझी आठवण म्हणजे
वाळूत खोल रुतलेले शंख ॥

तुझी आठवण म्हणजे
पक्षांचे उडणारे थवे
तुझी आठवण म्हणजे
रानात चमकणारे काजवे ॥

तुझी आठवण म्हणजे
मनाला केलेला स्पर्श
तुझी आठवण म्हणजे
सरता सरलेले वर्ष ॥

तुझी आठवण म्हणजे
आठवणींचा पाऊस
तुझी आठवण म्हणजे
आठवणींचा ऊरुस
फक्त आठवणींचा ऊरुस....

॥किरण जाधव ॥

एवढीशी चिमूरडी ती ...Kiran Jadhav

एवढीशी चिमूरडी ती
बोबडे बोल बोलायची
तुरूतुरू चालायची
दुडूदुडू धावायची...

लळा लावला होता तीनं
सार्याना..आपल्या हसण्याचा
छान-छान दिसण्याचा...

सार्यांची लाडकी ती
जो-तो उचलून घ्यायचा तीला
एखादं चॉकलेट देऊन
गोड-गोड पापा घ्यायचा तीचा..

एवढीशी चिमूरडी ती ,
बघाना.. आता वयात आलेय,
फुललेय...
गुलमोहरासारखी बहरलेय...

आजही ती, तशीच हसते-बोलते
सार्याना आपला लळा लावते
चॉकलेट बदल्यात पापा देणारी ती
कदाचित...
चॉकलेट बदल्यात पापा देणारी ती
आज बापाच्या जीवाला घोर लावते...
बापाच्या जीवाला घोर लावते...

==========================================================
किरण जाधव
==========================================================

Saturday, June 27, 2009

कुंकवाच्या डबीत...

कुंकवाच्या डबीत ...

त्याच वागण हे असच बेफिकीर,
अनाकलनीय, बेभान वार्र्यासारख;

एका क्षणात संसार उधळतो
शिव्यांची लाखोली वाहतो तिला
कधी तितक्याच बेशरमेन
कुशीत घेतो तिला..

त्याच्या अशा वागण्याची
सवय झालीय तिला
फक्त शरीर असत मनाशिवाय
त्याच्याबरोबर - बिछान्यावर
मनाला तर तीनं,
कधीच बंद केलय
"कुंकवाच्या डबीत" .....



किरण जाधव....[कुंकवाच्या डबीतलं मन शोधताना...]

Thursday, June 18, 2009

मृत्यूच भय... kiran jadhav

तो रडला, खूप रडला
ती गेली तेव्हा
जगायच नाही म्हणाला
ती मेली तेव्हा...

पण.. गम्मत बघा ना,
जगतोय.. अजूनही तो जगतोय
मरणाच्या गोष्टी करणारा तो
आज मरणालाच घाबरतोय...

स्पष्ट दिसत..डोळ्यात त्याच्या
सरत चाललेल वय
आणि...
...
"मृत्यूच भय"....

॥किरण जाधव॥